फक्त 2 मिनिटातच टॉयलेट उरका, जास्तवेळ लागल्यास 1200 रुपये दंड; कंपनीच्या फतव्याने कर्मचारी गॅसवर!
चीनच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी 2 मिनिटांच्या बाथरूम ब्रेकचा नियम लागू केला आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगरानी आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या अजब नियमावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

चीनमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नाही. अनेक चित्रविचित्र गोष्टी नेहमी चीनमध्ये घडत असतात. अशीच एक गोष्ट समोर आली आहे. ती वाचल्यावर तुम्हाला आश्चर्यही वाटेल आणि धक्काही बसेल. चीनच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘2 मिनिट टॉयलेट रूल’ लागू केला आहेय त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेला सुरुवात झाली आहे आणि कंपनीवर टीका केली जात आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक गोष्टीही वेठीस धरत असल्याचा टीका सोशल मीडियातून होत आहे.
कल्पना करा, ऑफिसमध्ये कोणाला वॉशरूमला जाऊन येणं आवश्यक असेल आणि त्याला फक्त दोन मिनिटे दिली तर काय होईल? हा प्रकार अमानवीय असेल की नाही? बरं त्यातही यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून कर्मचार्यांवर नजर ठेवली जात असेल आणि नियम तोडल्यावर कडक दंड वसूल केला जात असेल तर काय होईल? या सर्व गोष्टी अन्यायकारक आणि विकृत वाटतील ना? पण चीनच्या एका कंपनीने या गोष्टी प्रत्यक्षात उतरवून अमानवीपणाचा कळस गाठला आहे.
प्राचीन ग्रंथाचा हवाला
चीनमधील ग्वांगडोंगच्या फोशान येथील “थ्री ब्रदर्स मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी”ने 11 फेब्रुवारी रोजी दोन मिनिटांच्या वॉशरूम ब्रेकचा अजब नियम लागू केला. कंपनीने एका प्राचीन वैद्यकीय ग्रंथाचा हवाला देत म्हटलं की, हा नियम कर्मचार्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतला गेला आहे. याशिवाय या नियमाचा उद्देश कार्यक्षमता आणि कामाच्या ठिकाणी शिस्त वाढवणे देखील आहे.
तर एचआरची परवानगी घ्या
या नियमाच्या नुसार, कर्मचार्यांना सकाळी 8 वाजेच्या आधी, सकाळी 10:30 ते 10:40, दुपारी 12 ते 1:30, दुपारी 3:30 ते 3:40 आणि संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत वॉशरूमला जाऊन येण्याची परवानगी असेल. पण तीही फक्त दोन मिनिटांसाठी. म्हणजे ठरलेल्या वेळेत फक्त दोनच मिनिटं वॉशरूमला जाण्याची परवानगी असणार नाही. जर कुणाला या वेळेतून बाहेर जाऊन वॉशरूमला जावे लागले, तर त्यासाठी एचआरकडून परवानगी घ्यावी लागेल, असं कंपनीने म्हटलंय.
सीसीटीव्हीद्वारे लक्ष
या नियमाचा उल्लंघन केल्यास, कंपनी कर्मचार्यांच्या वॉशरूम ब्रेक्सवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवेल आणि नियम तोडणार्यांवर 100 युआन (सुमारे 1200 रुपये) दंड ठोठावेल. 11 फेब्रुवारीपासून पायलट प्रोजेक्ट म्हणून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आणि कंपनीने 1 मार्चपासून यावर कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती.
अन् निर्णय मागे घेतला
मात्र, या निर्णयावर सोशल मीडियातून प्रचंड टीका झाली. लोकांचं म्हणणं होतं की, हा निर्णय केवळ अनैतिक नाही, तर कर्मचार्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे कंपनीला हा निर्णय मागे घ्यावा लागला.
