किर्र शांतता, मध्यरात्री गाव झोपलेलं असताना बिबट्या आला आणि… सीसीटीव्हीत काय दिसलं ? थरारक Video पहाच

| Updated on: Aug 04, 2025 | 11:12 AM

सांगली जिल्ह्यातील येलूर गावात बिबट्याने कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. बिबट्याने साखळीने बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला, ज्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मदत मागितली आहे. यापूर्वीही या परिसरात बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले केले आहेत.

येलूर परिसरात बिबट्याचा वावर असून तेथे एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूर आणि कुरळप गावांच्या शिवेवर बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या हल्ल्यात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं ?

शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. येलूर-कुरळप शिवेवर शेतात घर असलेले शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर एक कुत्रा साखळीने बांधलेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याने कुत्र्याला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो साखळीला बांधलेला असल्यामुळे बिबट्या त्या कुत्र्याला दूरवर घेऊन जाऊ शकला नाही. ही संपूर्ण थरारक घटना पाटील यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रात्री रंगलेला थरार पहायला मिळतोय .

परिसरात भीतीचे वातावरण

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने येलूर आणि कुरळप परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. यापूर्वीही याच भागात बिबट्याने अनेकदा शेळ्या आणि इतर लहान जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी शेतात राहणाऱ्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि जनावरांचे तसेच मनुष्यहानी होणार नाही यासाठी तत्काळ पावले उचलावीत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

 

Published on: Aug 04, 2025 11:05 AM