प्रवासात सामानाची चिंता सोडा, भारतीय रेल्वेचे ‘मिशन सामानवापसी’; 2 कोटींचे साहित्य परत

आरपीएफने ‘मिशन अमानत’ मोहिम हाती घेतली आहे. देशभरातील रेल्वे प्रवाशांना गहाळ साहित्य पुन्हा प्राप्त करणे शक्य ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे नवीन मोहिमेची माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर हरविलेल्या/गहाळ साहित्याचा फोटो अपलोड केला जातो.

प्रवासात सामानाची चिंता सोडा, भारतीय रेल्वेचे ‘मिशन सामानवापसी’;  2 कोटींचे साहित्य परत
भारतीय रेल्वे

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना (Railway Passenger) आपल्या प्रवासादरम्यान सामानाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारतीय रेल्वेने (Indian Railwyas) प्रवाशांचे हरवलेले सामान पुन्हा मिळवून देण्यासाठी नवी मोहीम हाती घेतली आहे. प्रवाशी आपले गहाळ झालेले सामान सुलभपणे ट्रॅक आणि पुन्हा प्राप्त करू शकतात. रेल्वे संरक्षण दल (RPF) प्रवाशांसोबत त्यांच्या सामानाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे पावले उचलत आहे.

आरपीएफने ‘मिशन अमानत’ (Mission Amanat) मोहिम हाती घेतली आहे. देशभरातील रेल्वे प्रवाशांना गहाळ साहित्य पुन्हा प्राप्त करणे शक्य ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे नवीन मोहिमेची माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर हरविलेल्या/गहाळ साहित्याचा फोटो अपलोड केला जातो. प्रवासी मिशन अमानत-आरपीएफ वेबसाईट http://wr.indianrailways.gov.in वर पोस्ट केलेल्या फोटोंच्या सहाय्याने हरविलेल्या सामानाचे विवरण पाहू शकतो.

2.58 कोटींची सामानवापसी

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात हरविलेल्या साहित्याचा तपशील देण्यात आला आहे. वर्ष 2021 मध्ये, जानेवारी ते डिसेंबर दरम्यान पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने 1,317 रेल्वे प्रवाशांकडून 2.58 कोटींचे साहित्य प्राप्त केले आणि सुयोग्य पडताळणीनंतर साहित्याच्या मूळ मालकांकडे सोपविण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल ऑपरेशन मिशन अमानत अंतर्गत रेल्वे प्रवाशांना ही सुविधा प्रदान करते.

विना तिकिट प्रवाशांकडून 68 कोटी

पश्चिम रेल्वेने सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले आहे. अनधिकृत तसेच विना-तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवली आहे. रेल्वेत नियमित तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अभियनाच्या अंतर्गत एप्रिल, 2021 ते डिसेंबर, 2021 पर्यंत विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 68 कोटी रुपये आणि विना-मास्क कारवाईत 41.09 लाख रुपयांचा दंडात्मक महसूल प्राप्त केला आहे.

पश्चिम रेल्वे दृष्टीक्षेपात

पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या 17 क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. 1952 साली स्थापन झालेल्या पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानक येथे असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश ही राज्ये पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतात. वडोदरा रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे जंक्शन आहे.

मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस ह्या स्थानकांवरून बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. मुंबई उपनगरी रेल्वेचा पश्चिम मार्ग पश्चिम रेल्वेद्वारे चालवला जातो.

इतर बातम्या :

Video| मंदिरासमोरील झाडावर नागाने ठोकला तीन दिवस मुक्काम, तर्क-वितर्कांना उधाण; तुगाव हालसीमधील घटना

World Hindi Day : युनेस्कोच्या वेबसाईटवर भारतातील वारसा स्थळांची माहिती आता दिसणार हिंदी भाषेतही!

Published On - 10:19 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI