Dattatray Bharne : कृषीमंत्री भरणेंची दादा स्टाईल, पाहणी दौऱ्यादरम्यान ऑन द स्पॉट जिल्हाधिकाऱ्याला फोन अन् धरलं धारेवल
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर पूरग्रस्त मदतीच्या दिरंगाईवरून संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरच्या माढ्यात नुकसानीची पाहणी करताना त्यांनी थेट फोन करून, जाहीर झालेली मदत पोहोचली नसल्याबद्दल जाब विचारला. चारा आणि जेवणाची सोय तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यास दिरंगाई केल्याबद्दल तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरच्या माढा तालुक्यात नुकसानीची पाहणी करत असताना, भरणे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. उंदरगाव येथे लोकांच्या भावना ऐकून भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला.
ते म्हणाले, “तुम्ही सगळे कसे बसून काम करत आहात? उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अजूनही लोकांना का मिळाली नाही?” मदतीअभावी लोकांमध्ये संताप असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी अधिकारी अनुपस्थित असल्याबद्दलही भरणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रांत अधिकारी कुठे आहेत? तहसीलदार इथे का नाहीत?” असे प्रश्न त्यांनी विचारले. सध्या स्थलांतरित होत असलेल्या लोकांसाठी चाऱ्याची सोय आणि जेवणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याचे भरणे यांनी अधोरेखित केले.
