TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात

TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात

| Updated on: Jul 16, 2026 | 12:55 PM

अकोला जिल्ह्यातील अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या कामामुळे शेकडो शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाल्याने तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, चित्तलवाडी, परसरामपूर आणि अडगाव परिसरातील हजारो एकर शेती जलमय झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी करत आंदोलन छेडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला-खंडवा रेल्वेमार्गाच्या कामासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये साचले. पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक नाले किंवा मार्ग न ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके तीन ते पाच फूट पाण्याखाली गेली असून, अनेक शेतकऱ्यांना अद्याप पेरणीही करता आलेली नाही.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून जलसमाधी आंदोलन करत रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत, तातडीने पाण्याचा निचरा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हालचाल सुरू केली. प्रशासनाकडून जेसीबीच्या साहाय्याने शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पाण्याला मार्ग करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, केवळ पाण्याचा निचरा करून प्रश्न सुटणार नाही, तर पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा केली आहे. या प्रकरणात रेल्वे प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 12:55 PM
Follow Us