Anjali Damania : थर्ड क्लास व्यक्ती.. धनंजय मुंडेंच्या वाल्मिक कराडबाबतच्या वक्तव्यावरून दमानियांचा संताप
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्या मुंडवा जमीन घोटाळ्यातील एफआयआर नसल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील तपासात राजकारण न आणण्याचे आवाहन केले. तसेच, धनंजय मुंडे यांच्या वाल्मिक कराड यांच्यावरील विधानाला थर्ड क्लास संबोधत, अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्या निवडणूक निधीसंदर्भातील वक्तव्यांवरही टीका केली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच आपले मत व्यक्त केले. धनंजय मुंडे यांनी परळीच्या प्रचारसभेत वाल्मिक कराड यांची आठवण काढल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाल्मिक कराड यांनी केलेल्या राक्षसी कृत्यांची महाराष्ट्राला माहिती असतानाही मुंडे त्यांच्याबद्दल असे विधान करत असतील, तर ते थर्ड क्लास व्यक्ती आहेत, असे दमानिया यांनी म्हटले.
दरम्यान, पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर अद्यापही एफआयआर दाखल न झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जर सामान्य व्यक्तीने असा घोटाळा केला असता तर तात्काळ अटक झाली असती, असे त्यांचे म्हणणे आहे. स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी अमिडिया कंपनीला वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दमानिया यांनी खडगे समितीला आणि ईओडब्ल्यू अधिकाऱ्यांकडे या प्रकरणातील कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.
