Bacchu Kadu : …तर महाराष्ट्रात हंगामा होणार, 1 जुलैचा अल्टिमेटम देत बच्चू कडूंचा भाजपवर गंभीर आरोप काय?
आमदार बच्चू कडूंनी भाजपवर बदनामीचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप केला आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैपासून महाराष्ट्रात मोठा हंगामा होईल, असा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफी पूर्ण होईपर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मत न देण्याचे आवाहनही बच्चू कडूंनी केले आहे.
आमदार बच्चू कडूंनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि सरकारमधील काही घटकांवर आपल्या बदनामीचा अजेंडा राबवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी 30 जून ही सरकारसाठी अंतिम तारीख असून, 1 जुलैपासून आपली तारीख असेल असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. जर 30 जूनपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, तर 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठा हंगामा होईल, असे ते म्हणाले. “जिथे जाऊ तिथे हंगामा होईल, आम्ही सोडणार नाही, मेलो तरी बेहतर,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मत देऊ नये, असे आवाहनही बच्चू कडू यांनी मतदारांना केले आहे. त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.
