Battle for Alphonso: वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट कायदेशीर लढ्याचा इशारा
वलसाडकडून ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्याच्या प्रयत्नांना कोकणातील शेतकरी आणि आंब्या उत्पादकांनी तीव्र विरोध केला आहे. कोकण आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी हापूसच्या अस्मितेसाठी हायकोर्टापर्यंत लढण्याची भूमिका घेतली आहे. कोकणातील हापूसचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर सध्या वाद सुरू आहे. वलसाड हापूस म्हणून मानांकन मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, याला कोकणातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी महाराष्ट्र आणि कोकणाच्या वतीने बाजू मांडली आहे. २०१८ मध्ये कोकणातील हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळाले होते. २००८ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते, जेणेकरून शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा आणि मार्केटिंगमध्ये फायदा होईल. तत्कालीन वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात हे मानांकन प्राप्त झाले. आता मात्र, अनेक प्रांत हापूस हे नाव मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत. २०२२ मध्ये जुन्नरमधून ‘शिवनेरी हापूस’साठी आणि २०२३ मध्ये वलसाडमधून ‘वलसाड हापूस’साठी दावा करण्यात आला आहे. कोकणी शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट आहे की, ‘हापूस’ हे मानांकन केवळ कोकणाचे असून त्याला कोणताही उपसर्ग किंवा प्रत्यय जोडला जाऊ नये. हे मानांकन केवळ कोकणातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि आंब्याची शुद्धता राखण्यासाठी आहे.
