उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थोडं थांबा, भर उन्हात ट्रेकला जाणं तरूणांच्या आलं अंगाशी, घडलं काय?

उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थोडं थांबा, भर उन्हात ट्रेकला जाणं तरूणांच्या आलं अंगाशी, घडलं काय?

| Updated on: Apr 07, 2025 | 3:32 PM

 सह्याद्री रेस्क्यू टीमचे टीम लीडर चेतन कळंबे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी या सात ही तरुणांना अत्यावश्यक असलेले वैद्यकीय व खाण्याचे साहित्य, पाणी तसेच मानसिक आधार देत गडावरून सुखरूप खाली आणले आणि नेरळ पोलीस तसेच आलेल्या नातेवाईकांकडे स्वाधीन केले.

मुंबईतील कॉलेज तरुण-तरुणी पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान डोंगरा शेजारील पेब किल्ल्यावर शनिवार दि. 5 रोजी ट्रेक करण्यासाठी आले होते. किल्ल्यावर जाण्याचा रस्ताच भरकटल्याने भर उन्हामुळे उष्मघातासारखी परिस्थिती उद्भवल्याने यातील एक तरुणी बेशुद्ध पडल्याचे स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच सदर तरुणांना रेस्क्यू करण्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला पाचारण करण्यात आले होते.  मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे 21 ते 22 या वयाच्या आसपास असलेले कॉलेज तरुण-तरुणीपैकी सोनू साहू, निकिता जोबी, निखिल सिंग, साहिल लाले, चेतन पाटील, तेजस ठाकरे तसेच बेशुद्ध अवस्थेत असलेली हिबा फातिमा हा तरुणांचा ग्रुप सकाळी 8 वाजताच्या दरम्यान मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानच्या शेजारील पेब किल्ला अर्थात विकट गड या ठिकाणी ट्रेकला जाण्यासाठी आले होते.

नेरळ स्थानकापासून रिक्षाद्वारे आनंदवाडी येथे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर पेब किल्ल्याच्या दिशेने भर उन्हात डोंगर दर्‍यांची चढाई करत असताना किल्ल्याकडे जाणारा रस्ता भरकटल्याचे तरूणांच्या लक्षात आले. दरम्यान, सोबत आणलेले खाण्या-पिण्याचे साहित्य संपले असताना दुपारी ऊन वाढलं होतं. यामुळे हिबा ही तरुणी बेशुद्ध पडली. त्यानंतर सोनू साहू तसेच अन्य सहकाऱ्यांना देखील उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने घाबरलेल्या अवस्थेत तरुणांनी झालेल्या प्रकाराबाबत आपल्या नातेवाईक तसेच मित्रमंडळींना दूरध्वनीवरून माहिती दिली. नातेवाईकांनी या किल्ल्यापासून जवळच असलेल्या माथेरान वनविभाग, पोलिसांसह नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी क्षणाचाही विलंब न करता शिवाजी ढवळे यांनी या तरुणांच्या बचाव कार्यासाठी माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था संपर्क साधत घटनास्थळी भेट दिली आणि नातेवाईकांकडे स्वाधीन केले.

Published on: Apr 07, 2025 03:31 PM