Ashish Shelar : हे बडवे, कारकून कोण? अन् अचानक गळाभेट कशी? ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत शेलार यांचा ठाकरेंना थेट सवाल
आशिष शेलार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की मराठी माणूस त्यांची मागील भूमिका आणि आताच्या एकत्र येण्यामागील कारण विचारत आहे. मुंबईच्या विकासाऐवजी ही युती केवळ पक्षीय अस्तित्वासाठी आणि सत्तापिपासूपणासाठी असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास आनंदच आहे. परंतु, दोन राजकीय पक्ष एकत्र येत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शेलार यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या मागील “मातोश्रीला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला आहे” या विधानांवरून प्रश्न विचारला. हे बडवे आणि कारकून कोण होते, आणि आता त्यांच्याशीच हातमिळवणी का, असा सवाल त्यांनी केला.
शेलार यांनी म्हटले की, मुंबईकर आणि मराठी माणसाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिला आहे. या भीतीनेच हे दोन पक्ष एकत्र येत आहेत. त्यांची ही युती मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नसून, केवळ त्यांच्या पक्षीय अस्तित्वासाठी आणि सत्तापिपासूपणासाठी आहे. मुंबईच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, उलट महायुतीने केलेल्या विकासकामांना विरोधच केला, असा आरोप शेलार यांनी केला.
