Gauri Garje Death Case: कुटुंबाकडून छळ की पतीचे अनैतिक संबंध? पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे अन् गौरीचं कशावरून वाजलं?
डॉ. गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूची गंभीर माहिती समोर आली आहे. आज अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गौरी गर्जे यांचा मृतदेह काल संध्याकाळी कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. वरळी पोलीस ठाण्यात गौरी गर्जे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. वरळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुटुंबीयांनी गौरीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याचा तपास व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. गौरीच्या मैत्रिणींच्या आरोपानुसार, पती अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आणि नणंदेच्या मानसिक त्रासामुळे गौरी तणावात होती.
लग्नानंतर १० महिन्यांनी गौरीला अनंत गर्जे यांच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या गर्भपाताची फाईल सापडली होती, ज्यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. गौरी गर्जे शनिवारी दुपारपर्यंत ड्युटीवर होत्या आणि त्यानंतर घरी गेल्यावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. अनंत गर्जे सध्या गायब असून, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे. पंकजा मुंडेंनी पोलिसांना योग्य तपास करण्याचे निर्देश दिले असून, गौरीच्या वडिलांशीही संवाद साधला आहे.
