Mahayuti : ‘नंबर 2’ वरून एकनाथ शिंदेंना चव्हाणांनी डिवचलं अन् भाजप-शिवसेनेत जुंपली
स्थानिक निवडणुकांमधील वादामुळे महायुतीत तणाव वाढला आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी नंबर दोनला किंमत नसते, देवाभाऊच नंबर वन असे विधान करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. यावर नितेश राणेंनीही चव्हाणांना पाठिंबा दिला, तर शिंदे आणि दादा गप्प आहेत. हा वाद महायुतीतील पदांच्या वर्चस्वाचा प्रयत्न दर्शवतो.
स्थानिक निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. आर. आर. पाटील यांच्या भाषणाचा दाखला देत चव्हाण यांनी “नंबर दोनला किंमत नसते. जे काही आहे, ते देवाभाऊच आहे,” असे जाहीरपणे म्हटले. या विधानातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नंबर एक मानले, तर शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदावर अप्रत्यक्षपणे भाष्य केले. रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले.
भाजपचे नितेश राणे यांनीही “नंबर एकलाच महत्त्व असते आणि आज एक नंबरला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत,” असे म्हणत चव्हाणांच्या सुरात सूर मिसळला. दुसरीकडे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. महायुतीत सर्व समान असून कोणीही कुणाला डिवचण्याचा प्रयत्न करत नाही, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केले असले तरी, नंबर एक आणि नंबर दोनच्या या वादावरून महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.