BMC Assistant Commissioner : स्वतःच्या कार्यालयात डांबलं अन् बेदम… BMC च्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण, शिवीगाळ अन् खंडणीचे आरोप
बीएमसीचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणीचे आरोप झाले आहेत. निश्चित पटेल यांनी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार केली आहे. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, पाटील यांनी ७.५ कोटींच्या मदतीनंतर १४-१५ कोटी रुपयांची वसुली केली. पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणीचे गंभीर आरोप झाले आहेत. निश्चित पटेल नावाच्या व्यक्तीने हे आरोप केले असून, मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. पटेल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना स्वतःच्या कार्यालयात डांबून मारहाण करण्यात आली आणि महेश पाटील तसेच अन्य चार जणांनी त्यांच्याकडून १५ कोटी रुपये वसूल केले.
पटेल यांनी सुरुवातीला महेश पाटील यांच्याकडून व्यवसायाच्या विस्तारासाठी ७.५ कोटी रुपयांची मदत घेतल्याचे सांगितले. मात्र, नंतर पाटील यांनी त्यांच्याकडून १४ ते १५ कोटी रुपये वसूल केल्याचा दावा त्यांनी केला, ज्यामुळे त्यांना आपले दागिने आणि गाडी विकावी लागली. या आरोपांवर सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा जबरदस्ती केली नसल्याचे म्हटले आहे. मारहाणीच्या वेळी आपण तिथे उपस्थित नव्हतो, असा दावाही पाटील यांनी केला आहे.
