Buldhanas Lonar Lake : जागतिक दर्जाची ओळख असणाऱ्या खाऱ्या पाण्याचं सरोवर झालं गोडं? मासे दिसल्यानं खळबळ, सरोवराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या पाण्याच्या गुणधर्मांमध्ये मोठे बदल झाले आहेत. खाऱ्या पाण्याऐवजी आता गोड्या पाण्यातील मासे सरोवरात आढळले आहेत. यामुळे सरोवराची नैसर्गिक जैवविविधता धोक्यात आली असून, पाणी पातळीत वाढ, पीएच आणि टीडीएसमध्ये घट दिसून येत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सांडपाणी प्रवेश करत असल्याने या अद्वितीय सरोवराचे अस्तित्वच संकटात सापडले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याच्या गुणधर्मांमध्ये मोठे बदल झाल्याने त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळख असलेल्या या सरोवरात प्रथमच मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या शोधामुळे सरोवराची अद्वितीय जैवविविधता धोक्यात आली आहे. यावर्षी सरोवरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी, लोणार सरोवराच्या पाण्यात सूक्ष्मजीवही आढळत नव्हते, मात्र आता मासे आढळल्याने हे सरोवर गोड्या पाण्यात बदलत आहे की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पाण्याच्या पीएच आणि टीडीएस (Total Dissolved Solids) पातळीतही लक्षणीय घट झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे बदल पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहेत. सरोवरात आढळलेले टिलापिया (Tilapia) मासे तर पर्यावरणासाठी अधिकच हानिकारक मानले जातात. ग्रामस्थ आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याची पातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, गावातून येणारे सांडपाणी थांबवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यामुळे लोणार सरोवराचा पर्यावरणाच्या दृष्टीने ऱ्हास होत असून, सरोवराची जैवविविधता पूर्णपणे बदलली आहे.
