गुरा-ढोरांच्या डबक्यातील पाण्यानं गावकऱ्यांवर तहान भागवण्याची वेळ, कुठं आहे वास्तव?

| Updated on: May 26, 2023 | 10:52 AM

VIDEO | चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुक्यातल्या कोंडाणा गावाचे पाणी गुरंढोर पितात, त्याच पाण्याने तहान भागाविते गाव, 2 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना कुचकामी

Follow us on

चंद्रपूर : दिवसभर, रात्रभर ज्या डबक्यातील पाणी गुरढोरं-जनावरं पितात त्याच डबक्यातील पाण्याने तहान भागवण्याची दुदैवी वेळ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या कोंडाणा गावावर आली आहे. किमान प्यायला शुद्ध पाणी द्या, ही गावाची साधी मागणी आहे. मात्र त्याकडेही लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागासलेला अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील कोंडाणा हे लहानसे गाव. हे गाव धाबा ग्रामपंचायतीत मोडते. गावाला जाण्यासाठी धड रस्ता नाही. गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. नाल्या कच-याने तुडुंब भरलेल्या. गावात नळ योजना पोहोचली आहे. धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र ही योजना महिन्यातून दहा पंधरा दिवस बंदच असते. नळांना पाणी आलं तर ते एकतर गढूळ असतं, तर काही नळांना पाणी पोहचत नाही. अशा स्थितीत गावकरी एक कि. मी. अंतरावर असलेल्या नाल्यातील डबक्याचे पाणी आणतात. या डबक्याभोवती कुंपण नाही. या डबक्यातील पाणी गुरढोर पितात. मोकाट कुत्री या डबक्यात बसतात. जंगली जनावरही येथील पाण्याने तहान भागवतात. पहाटे याच डबक्यातील पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करतात. अख्खे गाव या डबक्यातील पाण्याने तहान भागवते. गावात नळ योजना कार्यान्वित होण्याच्या पूर्वी याच पाण्याने गावकरी तहान भागवायचे. आता नळ असले तरी तीच दुदैवी वेळ गावावर ओढावली आहे. विकासकामांचे कोट्यवधी रुपये नेमके जातात कुठे हाच प्रश्न ग्रामस्थाना पडला आहे.