विकासकामं केल्यामुळे शांत झोप लागते, Dattatray Bharane यांचा हर्षवर्धन पाटलांना टोला

| Updated on: Oct 16, 2021 | 4:54 PM

इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते, अशा शब्दात भरणेमामांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला. ते इंदापुरातील का खासगी कार्यक्रमात बोलत होते.

Follow us on

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. ‘भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शांत झोप लागते, कुठली चौकशीही नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला आहे. इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते, अशा शब्दात भरणेमामांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला. ते इंदापुरातील का खासगी कार्यक्रमात बोलत होते.

हर्षवर्धन पाटील हे आपलं खुमासदार भाषण आणि मिश्किल वक्तव्यांमुळं चांगलेच चर्चेत असतात. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर त्यांनी दिलं. ‘स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही’, असं वक्तव्य पाटील यांनी केलं. पाटलांच्या या वक्तव्यानं स्टेजवर उपस्थित सर्वांच खळखळून हसले.