Eknath Shinde : फोडाफोडीनंतरची इनसाईड स्टोरी शिंदेंनी सांगितली…नाराजीच्या चर्चांवर दिले रोखठोक उत्तर
महायुतीतील नाराजीनाट्य आणि दिल्ली दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खुलासा केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवर मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला, तसेच त्यांच्याकडे १२५ माजी नगरसेवक असल्याचा दावाही त्यांनी केला.
महायुतीमधील नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीमुळे निर्माण झालेल्या नाराजीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मनमोकळी चर्चा केल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावर कठोर सूचना दिल्या असून, युतीमध्ये गटबाजी होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुरू केलेल्या कथित फोडाफोडीमुळे शिंदे यांच्यासह त्यांचे मंत्री नाराज होते, अशी कबुली त्यांनी दिली.
शिंदे यांनी आपला दिल्ली दौरा बिहारमधील शपथविधी सोहळ्यासाठी होता, तक्रारीसाठी नव्हता असेही स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपच्या सर्वेनुसार १०० जागांवर विजयाचा दावा असताना, शिंदे यांनी त्यांच्याकडे १२५ माजी नगरसेवक असल्याचा दावा करत अधिक जागांवर हक्क सांगितला आहे. ठाकरे बंधूंनी आव्हान उभे केले तरी, मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
