Sanjay Raut | फोडाफोडीचा खेळ हा फक्त भाजप आणि शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटणार नाही, असा दावा राऊतांनी केलाय. मात्र फोडाफोडीचा खेळ हा फक्त भाजप आणि शिवसेनेमध्येच होणार आहे, असं विधानही त्यांनी केलंय.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विजयी नगरसेवक मुंबईतील वांद्रयाच्या ताज लँड एन्ड या हॉटेलमध्ये ठेवले आहेत, यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदमध्ये भाष्य केलंय. आमचे नगरसेवक हे आपापल्या घरी आहेत, आमच्या नगरसेवकांची बैठक मातोश्रीवरच होते. शिंदेंचे नगरसेवक त्यांनी डांबून का ठेवलेत याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर शिंदे भाजपचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे भाजपला ही माहित आहे, असं वक्तव्य राऊतांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे भाजपचे लोहपुरुष आहेत त्यांनी शिवसेना फोडली, त्यांना अमित शाह दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे ते काहीही करू शकतात, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटणार नाही, असा दावा राऊतांनी केलाय. मात्र फोडाफोडीचा खेळ हा फक्त भाजप आणि शिवसेनेमध्येच होणार आहे, असं विधानही त्यांनी केलंय.
