शरद पवारांवर विश्वासघाताचा ठपका, ‘मविआ’चा पोपट मेला? ठाकरेंची शिवसेना एक्झिट शोधतेय?

शरद पवारांवर विश्वासघाताचा ठपका, ‘मविआ’चा पोपट मेला? ठाकरेंची शिवसेना एक्झिट शोधतेय?

| Updated on: Feb 13, 2025 | 10:31 AM

दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मान झाला आणि इकडे ठाकरेंच्या शिवसेनेला चांगला संताप आला. शत्रूंचा सन्मान केल्याची टीका करत आम्हालाही राजकारण कळतं अशी टीका संजय राऊतांनी पवारांवर केली. तर विनायक राऊतांनी शरद पवारांवर थेट विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. महाविकास आघाडीत कसा स्फोट झालाय?

महाविकास आघाडीचा पोपट मेला हे वर्षभरा आधी फडणवीस म्हणाले होते. तीच स्थिती आज आधी संजय राऊत आणि नंतर विनायक राऊतांच्या शरद पवारांवरील टिकेनंतर आली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनी विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप विनायक राऊतांनी केला. एकनाथ शिंदेंना पवारांच्या हस्ते दिल्लीत पुरस्कार दिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा तीळपापड झाला. संजय राऊतांनी शत्रूंचा सन्मान केल्याची टीका केली पण विनायक राऊतांनी शरद पवारांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यामुळे महाविकास आघाडीची तब्येत बिघडत चालल्याचं दिसत आहे. शरद पवार आणि संजय राऊत या दोन्ही नेत्यांमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली पण संजय राऊतांनी अचानक ट्रॅक बदलल्याने काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. काही दिवसा आधी स्वतः उद्धव ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.

राऊतांची शरद पवारांवरील टीका म्हणजे स्वबळावर लढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती आहे का? विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत भविष्य नाही हे ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतंय का? ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी एक्झिट तयार करते का? दिल्लीच्या निकालानंतरही इंडिया आघाडीतल्या काँग्रेस आणि आपच्या घटक पक्षांवर टीका करतानाच एकत्र काम करायचं की नाही यावर विचार करावा लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. राऊतांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतंय की ठाकरेंच्या शिवसेनेच्या डोक्यात पुढ स्वतंत्र लढण्याचा विचार घोंगावतोय. म्हणूनच की काय आम्हालाही राजकारण कळतं असं म्हणत राऊतांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्ष शंका घेतलीच.

Published on: Feb 13, 2025 10:31 AM