Income Tax raid Mumbai : मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर ‘आयकर’ची धाड, 30 हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन
मुंबईतील प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाने पहाटेपासून मोठी छापेमारी केली आहे. करचोरीच्या संशयावरून मुंबईतील ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे, ज्यात राज शेट्टी यांच्या आस्थापनांचा समावेश आहे.
मुंबईतील प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाने पहाटेपासून व्यापक छापेमारी सुरू केली आहे. करचोरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात येत असून, मुंबई आणि आसपासच्या परिसरात ३० हून अधिक ठिकाणी आयकर विभागाचे पथक शोधमोहीम राबवत आहे. दादरमधील रामी हॉटेलसह रामी ग्रुपच्या विविध आस्थापना आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. रामी ग्रुपचे सर्वेसर्वा राज शेट्टी यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही आयकर विभागाकडून कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळी सुरू झालेल्या या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. छापेमारीच्या ठिकाणी कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयकर विभागाच्या पथकांनी पहाटेच संबंधित ठिकाणी पोहोचून आपले काम सुरू केले आहे. या छापेमारीत नेमके काय आढळते आणि किती रकमेची करचोरी उघडकीस येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.