Kankavli Election Row:  मुस्लिम मतांवरून राणेंचाच भाजपवर मोठा आरोप, मुस्लिम उमेदवार नको, मग मतं कशी चालतात?

Kankavli Election Row: मुस्लिम मतांवरून राणेंचाच भाजपवर मोठा आरोप, मुस्लिम उमेदवार नको, मग मतं कशी चालतात?

| Updated on: Nov 23, 2025 | 10:37 AM

कणकवलीत शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर मुस्लिम मतांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले आहेत. भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नसले तरी त्यांची मतं कशी चालतात, असा सवाल त्यांनी केला. नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरी बोगस मुस्लिम मतदार असल्याचा राणेंचा दावा आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.

कणकवली, सिंधुदुर्ग: शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भारतीय जनता पक्षावर मुस्लिम मतांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून मुस्लिम उमेदवारांना संधी दिली जात नसतानाही, त्यांना मुस्लिम समाजाची मते कशी चालतात, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. कणकवलीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या समीर नलावडे यांच्या घरावर तीन बोगस मुस्लिम मतदारांची नोंदणी असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर संपूर्ण वॉर्डात 169 बोगस मते असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

या आरोपांवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, हे मतदार आठ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे भाडेकरू होते आणि त्यांची नोंदणी तेव्हापासून त्यांच्या घराच्या पत्त्यावर आहे. हे मतदार बोगस नसून पूर्वापार भाडेकरू असल्याने त्यांच्या नोंदी अजूनही कायम आहेत असे नलावडे म्हणाले. निलेश राणे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी निवडणुकीच्या तोंडावर सुट्टीवर असल्याबद्दलही राणे यांनी नाराजी व्यक्त केली असून, निवडणुकीत पारदर्शकता राखण्याची मागणी केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कणकवलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Nov 23, 2025 10:37 AM