मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी… कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा बचाव केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते आणि त्यांनी पक्षप्रमुख या अधिकाराने पक्ष चालवला. पक्षफुटीनंतर अजय चौधरींची गटनेतेपदी नियुक्ती योग्य होती. सिब्बल यांनी १९९९ च्या घटनेचा आधार घेण्याला बेकायदेशीर म्हटले, तर २०१८ च्या घटनेला महत्त्व दिले.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद केला. सिब्बल यांनी जोर दिला की, उद्धव ठाकरे हे नेत्यांनी निवडलेले नेते होते आणि त्यांनी पक्षप्रमुख म्हणून अधिकाराने पक्ष चालवला. आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर अजय चौधरी यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती पूर्णपणे वैध होती आणि त्यावर शंका घेण्याचे कोणतेही कारण नव्हते, कारण चौधरींच्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही होती. महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या बैठिकीतील प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं मान्य केला मात्र नार्वेकर यांनी मान्य केला नाही. हा पक्षपातीपण आहे असाही दावा सिब्बल यांनी केला आहे.
सिब्बल यांनी १९९९ च्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घेण्याला बेकायदेशीर ठरवले. त्यांच्या मते, २०१८ मध्ये संविधानात जो बदल करण्यात आला, तो योग्य होता आणि त्याचा निवडणूक आयोगाला कळवण्यात आला होता. “हे सरकारच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यासारखे आहे,” असे उपमा देत सिब्बल यांनी काही दिवसांसाठी सत्ता ताब्यात घेऊन नंतर त्याला अधिकृत म्हणण्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय पक्षाच्या वैधतेला विधिमंडळ पक्षापेक्षा अधिक महत्त्व असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
