माधुरी परत करा, जिओ बॉयकॉट! कोल्हापुरात महादेवी हत्तीणीसाठी पदयात्रा अन् घोषणाबाजी

माधुरी परत करा, जिओ बॉयकॉट! कोल्हापुरात महादेवी हत्तीणीसाठी पदयात्रा अन् घोषणाबाजी

| Updated on: Aug 03, 2025 | 5:05 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आल्याने कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आल्याने कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी महादेवी हत्तीणला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर, श्री 1008 भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर अशी मूक पदयात्रा आयोजित करण्यात आली. या पदयात्रेत कोल्हापूर जिल्ह्यासह इतर राज्यांमधील सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

ही मूक पदयात्रा रविवारी पहाटे नांदणी येथून सुरू झाली. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील शिरोली फाटा, पुणे-बेंगळूरु महामार्गावरील तावडे हॉटेल, ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर आणि बसंत बहार टॉकीज मार्गे ही यात्रा कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. या पदयात्रेत राज्यभरातून हजारो नागरिकांनी भाग घेतला असून, सहभागींनी ‘माधुरी परत करा’ आणि ‘जिओ बॉयकॉट’ अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. ‘एक रविवार माधुरीसाठी’ असे म्हणत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मूक मोर्चात सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करून महादेवी हत्तीणला परत आणण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Published on: Aug 03, 2025 05:04 PM