Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… E-KYC अजून केलं नाही? तरी नो टेन्शन, आदिती तटकरेंची मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… E-KYC अजून केलं नाही? तरी नो टेन्शन, आदिती तटकरेंची मोठी अपडेट

| Updated on: Nov 18, 2025 | 6:02 PM

अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या मुदतवाढीची माहिती दिली आहे. आता लाभार्थी महिला 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करू शकतील. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक महिलांना कागदपत्रे गमावल्याने अडचणी आल्या होत्या. सुमारे 1.2 कोटी महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित महिलांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेच्या सद्यस्थिती आणि मुदतवाढीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता 31 डिसेंबरपर्यंत त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

सध्या, महाराष्ट्रातील एक कोटी वीस लाखांहून अधिक महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया 100% पूर्ण केली आहे. तर पन्नास लाखांपेक्षा जास्त महिलांची सुमारे 60% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अनेक महिलांना विविध कारणांमुळे ई-केवायसी पूर्ण करण्यात अडचणी आल्या होत्या. यामध्ये मे महिन्यापासून ते 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत झालेल्या अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि अवकाळी पावसाचा समावेश आहे. या नैसर्गिक आपत्त्यांमुळे अनेक लाभार्थ्यांनी आपली महत्त्वाची कागदपत्रे गमावली होती.

विशेषतः विधवा आणि एकल महिलांसारख्या वंचित घटकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसला. या सर्व बाबी लक्षात घेऊनच ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उर्वरित लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला असून, त्या आता त्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करू शकतील.

Published on: Nov 18, 2025 06:02 PM