Amravati : पोलीस पत्नीचा गळा घोटण्यासाठी पतीचा कट, 5 लाखांची सुपारी अन्… अमरावतीच्या प्रकरणात मोठी अपडेट
अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरुकृपा कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली होती. आशा धुळे या फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये नोकरी करत होत्या. त्यांच्या घरातच त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.
अमरावती शहरातील महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे (तायडे) या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीनेच पत्नीच्या हत्येसाठी पाच लाखांची सुपारी दिली होती. हत्या करणाऱ्या आरोपींना 25 हजार ॲडव्हान्स देण्यात आला होता. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा धुळे (तायडे) यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडे यानेच रचला होता. दोन मित्राच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली होती. आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी हत्येचा कट रचला होता. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी राहुल तायडे याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याने पती-पत्नीत सतत वाद होत असल्याची माहिती आहे. आरोपीचे 4- 5 वर्षापासून बाहेरील महिलेशी प्रेम संबंध असल्याचे या आधी देखील पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
