Maharashtra Rain: रायगड, पुण्याला पावसानं झोडपलं, IMDचा रेड अलर्ट अन् शाळा-कॉलेजला सुट्टी, बघा काय स्थिती?
रायगड, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. रायगडला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला तर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुंडलिका आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रायगड आणि पुणे जिल्ह्याला सकाळपासूनच पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. गेल्या 24 तासांत रायगड जिल्ह्यात 134 मिलीमीटर पावससाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढलेला असताना हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने रायगडमधील शाळा आणि कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातही पावसाचा जोर कायम असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुण्यातील हिंगणे खुर्द येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर पुण्यातील हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग गेट परिसरातही पाणी भरलं आहे. यासह रायगडमध्ये पावसाचा जोर वाढत असतानाच कुंडलिक नदीने आता धोका पातळी ओलांडली असून आंबा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
