Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी रेडी, नो रिस्क धोरण नेमकं काय?
महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, याकडे महायुतीचा भर असणार आहे. तर येणाऱ्या निवडणुकीत मित्रपक्षांना एकत्र येऊन कसा फायदा याकडे महायुती विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा नुकताच काल २७ जुलै रोजी ६५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अशातच एक मोठी बातमी सूत्रांकडून मिळतेय. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असून ठाकरे बंधूंसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण समोर येतंय. तर मुंबईसह प्रमुख महापालिका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
ठाकरेंना फायदा होऊ नये, यासाठी महायुती म्हणून एकत्र लढण्यावर भर असणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासह वाद महिन्याभरात मिटवून तयारीला सुरूवात केली जाणार आहे. सणा-सुदीच्या काळात जनतेपर्यंत पोहोचण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, मुंबईतील वॉर्डची जबाबदारी महायुतीच्या आमदारांकडे देण्यात येणार असून गोविंदा पथक, गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
