Manoj Jaranage | सरकारवर विश्वास वाढला, पण…; मनोज जरांगेंचं मोठं विधान चर्चेत
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, गॅझेट नोंदी आणि राज्यातील सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, गॅझेट नोंदी आणि राज्यातील सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.
माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले. बॉम्बे संस्थान, सातारा संस्थान, कोल्हापूर, मिरज, औंध आणि पुणे संस्थानांच्या गॅझेट नोंदी महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्या कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या गेल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हैदराबाद गॅझेटनंतर आता सातारा संस्थानाच्या गॅझेटची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक विषय टप्प्याटप्प्यानेच मार्गी लागतो. त्यात अनेक अडचणी आणि संकटे असतात. मात्र राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. तसेच सरकारला गॅझेट नोंदींबाबत सद्बुद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर पंढरपूरमध्ये आंदोलन करणारे आमदार रोहित पवार यांची भेट घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. रोहित पवार यांनी उपोषण स्थगित केल्याबाबत बोलताना त्यांनी शेतकरी प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, कोल्हापूर गॅझेटबाबतही चर्चा सुरू असून यासंदर्भात छत्रपती महाराजांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल. पूर्वी सरकारने अनेकदा फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांनी आता मात्र काही प्रमाणात विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. शिंदे समितीला मुदतवाढ, 58 नोंदींच्या प्रमाणपत्रांचे वाटप, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार दिलेल्या आदेशांमुळे सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आगामी काळात सरकार आणि मराठा समाज यांच्यातील चर्चांना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
