Manoj Jarange Patil : जरांगेच्या आंदोलनाला आजही परवानगी, तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू, बघा काय आताची परिस्थिती?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे तोडगा काय निघणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह मुंबईतील आझाद मैदानावर आक्रमक पवित्रा घेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. ऐन गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईत धडकणार असल्याने मुंबई हायकोर्टाकडून सुरूवातीला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिसांची भेट घेतल्यानंतर त्यांना एकच दिवस परवानगी देण्यात आली. मात्र त्यात आणखी वाढ करून सलग तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. तर त्यांच्या उपोषणाचा देखील तिसरा दिवस आहे. उपोषण सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी काल रात्री करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, आंदोलनाचा तिसरा दिवस असून हा महत्त्वाचा आहे. कारण काल शिंदे समितीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंदे समितीने विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर विखे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद झाला. त्यामुळे आता पुढचा मार्ग काय असणार हे आज स्पष्ट होणार आहे.
