Raj Thackeray : आज जर चुकलात तर कायमचं…. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
मुंबईतील शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरेंनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी अदानींच्या वाढत्या उद्योगांवरून महाराष्ट्र व मुंबईच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली. ही निवडणूक मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाची असून, बेसावध राहिल्यास मुंबई गमवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. मतदारांना सतर्क राहण्याचे आवाहन करत EVM आणि दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्यास सांगितले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. २०१४ पासून गौतम अदानी यांच्या उद्योगांच्या वाढीचा एक नकाशा त्यांनी सभेमध्ये दाखवला. महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.
महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना, भाजपने ड्रग्ज आणि बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपींना तिकीट दिल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. गौतम अदानी हे २०१४ पूर्वी सिमेंट उद्योगात नव्हते, मात्र आज ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट व्यापारी बनले आहेत. भविष्यात अदानींनी वीज किंवा सिमेंटवर नियंत्रण मिळवल्यास सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती बिकट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच, महाराष्ट्रातील बंदरे आणि विमानतळे अदानींना दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राज ठाकरेंनी या निवडणुकीला मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक संबोधले. “आज जर चुकलात, तर कायमचे मुकलात” असा इशारा देत, मुंबई महाराष्ट्राला १०७ हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाली आहे, ती गमावू नका, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी EVM मशीनवर लक्ष ठेवण्याचे आणि दुबार मतदारांबाबत सतर्क राहण्याचे निर्देश दिले.