Raj Thackeray : माझे काका… जुना फोटो शेअर करत राज यांचं अभिवादन, भाजपला कमंडलवादावरून कानपिचक्या
११ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र आले. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो ट्विट करत अभिवादन केले आणि राजकीय संदेश दिला. गंभीर आजारपणातही संजय राऊत यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर बाळासाहेबांसोबतचा एक जुना फोटो शेअर करत एक सविस्तर ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि आपले काका म्हणून आदराने उल्लेख केला. बाळासाहेबांनी भाषिक अस्मितेच्या जोरावर एक मोठी चळवळ उभी करून राजकीय पक्षाला जन्म दिला, तसेच जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भाजपचा कमंडलवाद फोफावण्यापूर्वी हिंदू अस्मिता जागृत करण्याचे काम केले, असे राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेबांनी हिंदूंना व्होट बँक म्हणून कधी पाहिले नाही, तर त्यांच्यासाठी हा अस्मितेचा विषय होता, असेही त्यांनी नमूद केले. प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद आणि चिकित्सक वृत्ती बाळासाहेबांनी कधी सोडली नाही, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारसदार म्हणून मिरवणाऱ्यांची गंमत वाटते. फक्त मतं मिळवून सत्ता मिळाल्यावर वाटेल तसे ओरबाडणे हे राजकारण रूढ होत असताना, आधी समाजकारण आणि नंतर राजकारण हे विचार रुजवणारे बाळासाहेब होते. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे काही राजकीय पक्षांवर निशाणा साधला. त्यांचे हे ट्विट आणि स्मृतीस्थळावरील त्यांची उपस्थिती, दोन्ही गोष्टींना राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व दिले जात आहे.
