Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स कायम? राज ठाकरे तूर्तास तयार नाहीत? स्पष्टच म्हणाले मेळावा म्हणजे…
मराठी भाषेवरून आयोजित केलेल्या विजय मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्यांच्या युतीकडे सर्वांच्याच नजरा होत्या. पण मेळाव्यात एकत्र येणं याचा युतीशी काहीही संबंध नाही असं अनौपचारिक गप्पांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर राज ठाकरे अद्याप तयार झालेले नाहीत असंच दिसतंय.
मेळाव्यात एकत्र येणं याचा युतीशी काहीही संबंध नाही हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. असं असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय. मनसेच्या तीन दिवसीय शिबिरासाठी इगतपुरीत आलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय की मराठीचा विजय मेळावा केवळ मराठी पुरताच त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय चित्र पाहूनच युतीचा निर्णय होईल. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढलाय. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही हे अद्याप राज ठाकरेंनी ठरवलेलं नाही.
मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यात देखील राज ठाकरेंनी या मेळाव्याचा आणि राजकीय झेंड्याचा संबंध नाही हे उद्धव ठाकरेंसमोरच सांगितलं होतं. ‘मोर्चाला ही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्याला ही तीच गोष्ट आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा‘, असं राज ठाकरेंनी स्पष्ट म्हटलंय. विशेष म्हणजे एक दिवस आधीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे आत्तापर्यंत एकट्याने लढत आली आहे अस सूचक वक्तव्य केलं होतं आणि मनसेची एकटं लढण्याची तयारी सुरू आहे हे देखील इगतपुरीच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांना टोला लगावला.
