आला रे आला… आता ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणार… छत्र्या, रेनकोट काढून ठेवा; मान्सून अखेर केरळात
देशभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा तीन दिवस उशिराने केरळमध्ये पोहोचला असून आता त्याच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची पुढील प्रगती समाधानकारक असून दक्षिण महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
देशभरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा तीन दिवस उशिराने केरळमध्ये पोहोचला असून आता त्याच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाचे वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची पुढील प्रगती समाधानकारक असून दक्षिण महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भातील नागरिकांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असून 15 जूननंतरच मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या उत्तर प्रदेशपासून विदर्भमार्गे रायलसीमापर्यंत उंचावरील सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागांमध्ये पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस मान्सूनपूर्व नसून अवकाळी स्वरूपाचा असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम असून ढगाळ वातावरण असतानाही तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया आणि वर्धा येथेही तापमानात 1 ते 2 अंशांची वाढ नोंदवण्यात आली. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला असला तरी विदर्भात खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास अजून काही दिवस लागणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीकडे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
