Nagpur Civic Elections: नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, वाट्याला आलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपावरून शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आठपैकी सहा जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केल्याने इच्छुकांमध्ये संताप आहे. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी शिवसेना नेते नितीन गडकरींच्या भेटीला पोहोचले आहेत.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या आठ जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केल्याने शिवसेनेत तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे नाराज शिवसेना नेते आशिष जैस्वाल, किरण पांडव, आमदार कृपाल तुमाणे आणि अन्य इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर शिवसेनेला आठ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, या आठपैकी फक्त दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील, तर उर्वरित सहा जागांवर भाजपचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढणार आहेत. शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी समोर आली आहे. महायुतीचा निर्णय झाला असला तरी, उमेदवार निश्चितीवरून अजूनही चर्चा आणि वाटाघाटी सुरूच आहेत.
