बायका कुणाच्या पैशाला बळी पडत नाही! नवनीत राणांच्या विधानाची चर्चा
अकोल्यात बोलताना नवनीत राणा यांनी महिला मतदारांना अधिक प्रामाणिक आणि निष्ठावान संबोधले. पुरुषांच्या तुलनेत महिला कोणत्याही पैशाला किंवा पार्टीला बळी पडत नाहीत. त्या घर सांभाळतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत इमानदार राहतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अकोल्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी महिला मतदारांच्या निष्ठेबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार अधिक प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात, असे त्यांनी म्हटले. “बायका कधीही कोणाच्या पैशाला बळी पडत नाहीत आणि कोणाच्याही पार्टीला जात नाहीत,” असे राणा यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, पुरुष मंडळी अनेकदा पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि रात्री उशिरा घरी परततात. याउलट, महिला मतदार घराची जबाबदारी सांभाळतात आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कुटुंबाला आणि तत्त्वांना एकनिष्ठ राहतात. त्या चटणी-भाकर खाऊनही घराला घरपण देतात आणि त्या एक इमानदार मतदार आहेत, असे नवनीत राणांनी सांगितले. यावेळी नवनीत राणा यांनी अकोट शहरातील आपल्या उपस्थितीचा उल्लेख केला,
तसेच भंडारा-गोंदिया (सासर), मेळघाट (सर्वाधिक प्रेम), दर्यापूर (भूमिपुत्रांचा मतदारसंघ), आणि अकोट या क्षेत्रांशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर प्रकाश टाकला. देशाच्या आणि राज्याच्या विकासात पंतप्रधान आणि देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) यांचे योगदान अधोरेखित करत त्यांनी उमरखेडसारख्या छोट्या तालुक्यातही विकासाची संकल्पना स्पष्ट केली.
