Laxman Hake : कारची काच फुटली, नंरप्लेट तुटली, हल्ला होताच हाके संतापले, मनोज जरांगे म्हणाले स्वत:च्या प्रसिद्धीसाठी…
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर झालेल्या हल्ल्यात गाडीची काच फुटली आणि नंबर प्लेट तुटली. हाकेंनी हा नववा हल्ला असल्याचे सांगत जगण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र हाकेंनी प्रसिद्धीसाठी स्वतःवरच हल्ला करून घेतल्याचा आरोप केला.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरवरून पाथर्डीकडे जात असताना हल्ला करण्यात आला आहे. नगर बायपासजवळील सारंगी हॉटेलजवळ ८ ते १० जणांच्या जमावाने हाकेंच्या गाडीवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात गाडीची काच फुटली असून, नंबर प्लेटचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. “आजपर्यंत ९ वेळा हल्ला झालेला आहे. आम्ही जगायचं की नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “लढा असाच सुरू राहणार, जीव जाईपर्यंत लढा सुरू राहणार,” असेही हाके म्हणाले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाकेंवरच गंभीर आरोप केले. “प्रसिद्धीसाठी काही जण स्वतःच दगड मारून घेतात, हल्ला करून घेतात,” असे जरांगे पाटील म्हणाले. “भिकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. हे जातिवाद करतील किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचा ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतःच प्रसिद्धीसाठी दगड मारून घ्यायचे,” अशी टीकाही जरांगे पाटलांनी केली.
