अमोल कोल्हे – अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. जिजाई बंगल्यावर अर्धा तास चाललेल्या या भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमधील युतीबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. काल युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर आजच्या या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
पुण्यातील राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्याच्या जिजाई निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये युतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही भेट सुमारे अर्धा तास चालली असल्याची माहिती मिळत आहे.
या भेटीमागे मोठा राजकीय संदर्भ आहे. कालच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते. या भेटीदरम्यान जागावाटपावर तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांनी तुतारी चिन्हावरील उमेदवारांनी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली. या मागणीमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिस्कटली. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी रात्री महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली होती.