Supriya Sule : विकासात ‘दादागिरी’चा अडथळा, फडणवीसांच्या विधानावर सुप्रिया सुळेंचा थेट सवाल; दिलं थेट आव्हान
पुण्याच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे दादागिरी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर दादागिरी होत असेल तर मकोका लावण्याच्या सूचना आहेत, असं अजित पवार यांनीही म्हटलय.
पुण्याच्या विकासाच्या प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विकास प्रक्रियेत दादागिरी हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पुण्यातील उद्योजकांना निर्णय घेण्यास अडचणी येत असल्याचे वक्तव्य केले. पुण्यातल्या उद्योजकांना निर्णय करू दिला जात नाही, असंही फडणवीस म्हणाले. तर फडणवीस यांच्या या वक्तव्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ज्या स्टेजवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं त्या स्टेजवर अजित पवार देखील होते. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अजित दादांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. त्यामुळे फडणवीसांचा रोख अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली. पुण्यातली दादागिरी मोडीत काढण्यासाठी मकोका लावण्याच्या सूचना आपण पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणाले. दरम्यान, ‘तुम्हाला जर माहीत असेल महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चाललीये, मोडून काढा ती दादागिरी आम्ही तुम्हाला साथ देऊ.’, असं म्हणत पुण्यामध्ये दादागिरी कोण करतंय हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय.
