Jain Boarding Land Sale: मुरलीधर मोहोळांना जैन समाजाचा घेराव, मुनींकडून थेट अल्टिमेटम अन्…
जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना जैन समाजाने घेराव घातला आहे. जैन मुनींनी या प्रकरणी १ नोव्हेंबरपर्यंत व्यवहार रद्द न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा अल्टिमेटम दिला. मोहोळ यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले, तरी यावरून धंगेकर आणि मोहोळ यांच्यातील राजकीय वादही तीव्र झाला आहे.
जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी घेराव घालत जाब विचारला. या घटनेमुळे मोहोळांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज मोहोळ थेट जैन बोर्डिंगमध्ये पोहोचले असताना जैन मुनींनी १ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. जोपर्यंत हा जमीन व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत अन्न-जल त्याग करण्याचा निर्धार मुनींनी व्यक्त केला. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींना नमस्कार करत, अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही आणि हा विषय १ नोव्हेंबरपूर्वीच संपेल असे आश्वासन दिले. आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन समाजाच्या सोबत उभे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे मोहोळ यांनी पुन्हा एकदा सांगितले. एका बाजूला जैन समाजाने मोहोळांना घेराव घातल्यामुळे परिस्थिती तापली असताना, दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरून शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील राजकीय वादही आणखी चिघळला आहे.
