Thackeray Brothers : याचसाठी केला होता अट्टहास! हातात लाल गुलाबांचा गुच्छ, अन् भावाची गळा भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे केवळ मोजक्याच प्रसंगी मातोश्रीवर गेले होते, परंतु आज कोणत्याही राजकीय किंवा कौटुंबिक बंधनांशिवाय त्यांनी स्वेच्छेने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री गाठली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर उत्साहपूर्ण वातावरण आहे. निवासस्थानाबाहेर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, ठिकठिकाणी शुभेच्छा संदेशांचे बॅनर्स आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले असून, आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत. राज ठाकरे यांचे मातोश्रीवरील आगमन अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक मानले जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी मातोश्रीला भेटी मर्यादित ठेवल्या होत्या, आणि ज्या वेळी ते गेले, तेव्हा त्यामागे विशेष कारण होते, जसे की अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी. मात्र, यावेळी राज ठाकरे प्रथमच पूर्णपणे स्वखुशीने मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यामुळे ही भेट केवळ मैत्रीपूर्ण भेट नसून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा प्रारंभ ठरू शकते, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
