अन् भावासाठी राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर पाऊल ठेवणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 20 वर्षांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले आहेत.
काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर जाणार आहेत. काही वेळापूर्वीच राज ठाकरे दादरमधील आपल्या निवासस्थानावरून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांचे मातोश्रीवर जाणे अनेक अर्थांनी ऐतिहासिक मानले जात आहे. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे काही अपवादात्मक प्रसंग वगळता मातोश्रीवर गेले नव्हते. ज्या वेळी ते गेले, तेव्हा त्यामागे काही महत्त्वाचे कारण होते. मात्र, आता प्रथमच राज ठाकरे स्वेच्छेने मातोश्रीवर पाऊल ठेवणार आहेत.
शिवसेनेत असताना राज ठाकरे मातोश्रीवर नियमितपणे जायचे. लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिल्याने त्यांची जडणघडण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाली होती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांसोबत मातोश्रीवर अनेकदा असायचे. पण शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्री यांच्यातील संबंध तुटले होते. आता, अनेक वर्षांनंतर राज ठाकरे पुन्हा मातोश्रीवर जाणार असल्याने हा महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा प्रारंभ मानला जात आहे.
मराठी मेळाव्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात युतीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती, ज्यामुळे युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमुळे मनसे-शिवसेना युतीच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. ही भेट अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे.
