Ravindra Dhangekar : समीर पाटलांच्या 100 कोटींच्या मालमत्तेवर धंगेकरांचा सवाल; घायवळ संबंधांवरून चंद्रकांतदादांवर खळबळजनक आरोप

Ravindra Dhangekar : समीर पाटलांच्या 100 कोटींच्या मालमत्तेवर धंगेकरांचा सवाल; घायवळ संबंधांवरून चंद्रकांतदादांवर खळबळजनक आरोप

| Updated on: Oct 08, 2025 | 6:03 PM

रवींद्र धंगेकरांनी समीर पाटील यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळसोबतचे फोटो सादर करत चंद्रकांत पाटलांवर आरोप केले. समीर पाटील यांच्या १०० कोटींच्या संपत्तीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, धंगेकरांनी पोलिसांकडून चौकशीची मागणी केली. यावर समीर पाटील यांनी निवडणूक पराभवाचा राग असल्याचे म्हटले.

रवींद्र धंगेकरांनी कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळाल्यानंतर चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात ‘लुडबुड’ करणाऱ्या समीर पाटीलचे आणि निलेश घायवळचे काय संबंध आहेत, असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला. धंगेकरांनी समीर पाटीलचे निलेश घायवळसोबतचे फोटो देखील दाखवले. यावेळी धंगेकरांनी समीर पाटील यांच्या १०० कोटींच्या प्रॉपर्टीच्या तपासणीची मागणी केली. समीर पाटील यांना ही प्रॉपर्टी कशी मिळाली, त्यांच्या व्यवसायात राजकीय भागीदारी आहे का, या सगळ्याची चौकशी पोलिसांनी करावी, असे धंगेकर म्हणाले.

या आरोपांवर उत्तर देताना समीर पाटील यांनी धंगेकरांना जनतेने निवडणुकीत औकात दाखवल्याचा राग असल्याचे म्हटले. समीर पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा सल्ला देत धंगेकरांच्या आरोपांना कमी महत्त्व दिले. धंगेकरांनी गृहखात्याकडे निलेश घायवळ प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि देवेंद्र फडणवीस यांना योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Oct 08, 2025 06:03 PM