विमान कंपनीला वाचवण्याची धडपड सुरू आहे का? रोहित पवारांचा संतप्त सवाल
रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कंपनीवर कारवाई का होत नाही, याचे कारण म्हणजे मालक रोहित सिंगचे सत्तेतील अनेक नेत्यांशी असलेले संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका मोठ्या अपघातानंतरही रोहित सिंग परदेशात पसार झाला असून, कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा पवार यांनी केला आहे. पारदर्शक चौकशीसाठी स्वतंत्र देखरेख यंत्रणेची मागणीही त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी VSR कंपनीवर कारवाई न होण्यामागे राजकीय संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमान अपघाताच्या घटनेनंतरही कंपनीची चौकशी का थांबली आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आज अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनावर बोलताना त्यांनी म्हंटलं की, कंपनीचा मालक रोहित सिंग याचे लग्न राजस्थानमध्ये झाले होते, ज्यात महाराष्ट्रातील आणि आंध्र प्रदेशमधील सत्तेतील अनेक नेते उपस्थित होते. आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे एक प्रमुख नेते, जे आता देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत, त्यांनी VSR च्या लेअरजेट एअरक्राफ्टमध्ये कोणतीही सुरक्षा समस्या नसल्याचे म्हटले आहे. रोहित सिंग सध्या अमेरिकेत पळून गेला असून, त्याची दुबई आणि अमेरिकेतही कंपनी आहे. VSR कंपनीला वाचवण्यासाठी सत्तेतील लोकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी सीबीआय आणि सीआयडीसोबतच एक स्वतंत्र देखरेख यंत्रणा असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
