Saamana : लोकशाही पुन्हा कलंकित, सर्व स्तंभ… भाजपचा बिनविरोध निवडणूक घोटाळा; ‘सामना’तून घणाघात
महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या सद्यस्थितीवर सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भाजपने बिनविरोध पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी अवलंबलेल्या कथित घोटाळ्यांमुळे लोकशाही पुन्हा कलंकित झाली असल्याचा घणाघात सामनाने केला आहे
महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातील भाजपवरची टीका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने बिनविरोध निवडणुका जिंकण्यासाठी अवलंबलेल्या कथित घोटाळ्यांमुळे लोकशाही पुन्हा कलंकित झाली असल्याचा घणाघात सामनाने केला आहे. या अग्रलेखातून निवडणूक आयोगासह सरकारवरही गंभीर टीका करण्यात आली आहे.
सामनाने म्हटले आहे की, लोकशाहीचे सर्व स्तंभ कोसळताना दिसत आहेत. भाजपचे हस्तक म्हणून काम करणारे अधिकारी केवळ दिल्लीतच नव्हे, तर जिल्हा आणि तालुका पातळीवरही सक्रिय आहेत. भाजप पुरस्कृत अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घेतल्यामुळे कुणाचे अर्ज फेटाळायचे, कुणाचे बाद करायचे, किंवा कुणाला कसे बिनविरोध निवडून आणायचे यावर निवडणुकीपूर्वीच निर्णय घेतले जातात. जामनेर, दोंडाईचा, अनगर यांसारख्या ठिकाणी विरोधी उमेदवारांना भाजपने जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावले, त्यासाठी धमक्याही देण्यात आल्या. अशा वातावरणामध्ये निवडणूक घेणे महाराष्ट्राला शोभणारे नाही आणि यामुळे लोकशाहीची हत्या झाल्याचे सामनाने नमूद केले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही हे प्रकार घडत असतील, तर संविधानाची प्रतिष्ठा काय राहिली, असा प्रश्न सामनाने उपस्थित केला आहे.
