Sandeep Deshpande : मुंबईतील मोर्चांवर कारवाई, मनसे अन् मविआवर गुन्हा दाखल, मनसे नेत्यानं भाजपला घेरलं, त्या मूक मोर्चाला…
संदीप देशपांडे यांनी मनसे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी भाजपच्या मूक मोर्चाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ त्यांच्याच मोर्चांवर कारवाई का, असा सवाल केला. असल्या केसेसना भीक घालत नसल्याचेही देशपांडे म्हणाले.
मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात विरोधाकांच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस आणि दुबार मतदारांविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या आयोजकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचे समोर आले आहे. या कारवाईवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे यांनी भाजपच्या कथित मूक मोर्चाला परवानगी होती का, असा सवाल उपस्थित केला आहे. देशपांडे यांनी विचारले की, जर भाजपच्या मोर्चाला परवानगी होती, तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? आणि जर परवानगी नव्हती, तर मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? एकट्या मनसे आणि महाविकास आघाडीवरच गुन्हा का दाखल करण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अशा केसेसना आपण भीक घालत नाही आणि यापूर्वीही अनेक केसेस अंगावर असल्यामुळे फरक पडत नसल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
