हो, अनिलकुमार पवार माझे…; वसई-विरार ईडीच्या कारवाईवर दादा भूसेंची मोठं विधान
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दावा करत गंभीर आरोप केले. ‘सामना’ या दैनिकात त्यांनी लिहिले की, भुसे यांच्या शिफारशीमुळे पवार यांना आयुक्तपदावर बढती मिळाली. या आरोपांनंतर दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले.
भुसे म्हणाले, संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आरोप केले आहेत. पुरेसा अभ्यास न करता त्यांनी हे दावे केले. होय, पवार हे माझे नातेवाईक आहेत. माझ्या बहिणीची मुलगी त्यांच्या कुटुंबात लग्न करून गेली आहे, हे मी नाकारत नाही. पण मी राजकारणात येण्यापूर्वीपासूनच अनिल पवार या सेवेत होते आणि त्यांनी विविध ठिकाणी काम केले आहे.
ते पुढे म्हणाले, वसई-विरारच्या आयुक्तपदाचा विषय आहे, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच पवार यांना त्या पदावर नेमले होते. कोण कोणाचे नातेवाईक आहे, यावरून चौकशीवर काही परिणाम होत नाही. चौकशीतून सत्य समोर येईल आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. यापूर्वीही राऊत यांनी माझ्यावर खोटे वैयक्तिक आरोप केले आहेत.
भुसे यांनी पवार यांच्या नियुक्तीतील शिफारशीबाबत स्पष्ट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, राऊत यांना फक्त पोडियमवर येऊन बोलायचे आणि मग लपून बसायचे याशिवाय दुसरे काही काम नाही. अनिल पवार यांची नियुक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली, मग ती राऊत यांनीच केली असे मी म्हणू शकतो. राऊत कोणासाठी काय शिफारशी करतात, हे आम्ही सांगायचे का? माझे अनेक नातेवाईक आहेत, पण प्रत्येकवेळी फक्त आरोप करणे हा उत्तर असू शकत नाही.
