Dattatray Bharne : म्हणूनच सत्तेत आलेत, पण आता सोडणार नाही… नव्या कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राऊत अन् पवारांनी फटकारलं
एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात असं वक्तव्यही दत्तात्रय भरणे यांनी जाहीरपणे केल्याचे पाहायला मिळालंय. दरम्यान, कृषीमंत्री झाल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादाची शक्यता आहे.
इंदापुरात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे नवे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल अधिकाऱ्यांसमोरच वादात सापडणारं वक्तव्य केलं. कारखान्याचे संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. इतकंच नाहीतर एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची माणसं नोंद ठेवतात असे उद्गार त्यांनी काढले. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना चांगलंच फटकारल्याचे पाहायला मिळाले.
‘ते वाकडी काम करुन सतेवर आले. ते काही सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत का? मग बेईमानी करुन दुसऱ्या पक्षात गेले. वाकडी काम करुन जे सत्तेवर आले, त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवता येणार नाही’, असं राऊत म्हणाले. तर वाकडं कामं करण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्रिपद दिलं नाही. वाकडं काम केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणत रोहित पवाारांनी भरणेंना थेट इशाराच दिला.
