Sanjay Raut : ते बरं दिसणार नाही, म्हणून.., राज ठाकरे संजय राऊतांशी काय बोलले?
Sanjay Raut News : हिंदी भाषा सक्तीवर ठाकरे बंधु आता एकत्रित मोर्चा काढणार आहेत. त्यासाठी राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन केला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी सांगितला.
हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधु मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, हे सांगण्यासाठी मला राज ठाकरे यांचा फोन आला होता, असं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. राज्यातील शाळांना हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. काल यासंदर्भात मनसे आणि शिवसेना उबाठा गटाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांकडून मोर्चे काढण्याची घोषणा झाली. त्यानंतर आता या मोर्चात बदल करून वेगवेगळे मोर्चे न काढता ठाकरे बंधूंचा एकच एकत्रित मोर्चा निघणार आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. हा निर्णय घेण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा झाली याची माहिती आज प्रसार माध्यमांना बोलताना राऊत यांनी दिली.
यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितलं की, मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सहा तारीख ही सोईची नाही. त्या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे एकतर राज ठाकरे यांनी सात तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावे, किंवा पाच तारखेला आंदोलन करावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले आणि पाच तारखेला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय झाला, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
