ते वाटण्यासारखं टनटन.. ; संजय राऊतांची नितेश राणेंवर खरमरीत टीका
मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरू सोबत चर्चा केली असल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे
नितेश राणे नावाच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरू सोबत चर्चा करणं हे त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरू सोबत चर्चा केली असल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर ही टीका केली आहे. नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटण्यासारख उडत असतो. त्याच्या जुन्या फोटोमध्ये तो आणि त्याचे वडील मिया राणे रोजा सोडत आहे, नमाज पढत आहे, अशीही खरमरीत टीका राऊतांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मोहन भागवत हे जर मुस्लिम समाजाच्या वरिष्ठ मौलवींशी चर्चा करत असतील, त्यांची मतं समजून घेत असतील, तर नितेश राणे यांनी लगेच राजीनामा देऊन अशा गोष्टीचा निषेध केला पाहिजे. भाजपचा आणि संघाचा त्यांनी निषेध करायला हवा, कारण हे त्यांच्या कठोर हिंदुत्वाच्या विचारात हे बसत नाही. खुर्चीला चिटकून बसू नका, धर्मासाठी राजीनामा द्या. या देशात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो. त्यांच्यापुढे पाकिस्तानात जाण्याचा पर्याय होता. पण त्यांनी भारत हाच आपला देश मानला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधींच्या बरोबरीने मुस्लिम समाज बांधव होते. अनेक मुस्लिम वीर त्यावेळी फासावर गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील अमर शेख सारखे लोक काम करत होते. हे या वातावरण बिघडवणाऱ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मोहन भागवत यांच्या कार्याचं आम्ही स्वागत केलं असल्याचं देखील राऊतांनी सांगितलं.
