Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महीने पूर्ण; न्यायची लढाई सुरूच

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्येला 4 महीने पूर्ण; न्यायची लढाई सुरूच

| Updated on: Apr 09, 2025 | 12:10 PM

4 Months Complete To Santosh Deshmukh Death : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महीने पूर्ण झाले आहेत. अजूनही न्यायची लढाई सुरूच आहे. आरोपींना शिक्षा कधी होणार? असा प्रश्न कायम आहे. या संपूर्ण प्रकारावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 4 महीने झाले आहेत. त्या भयानक घटनेला 4 महीने उलटुन देखील आजही संतोष देशमुख यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत अस्वस्थ आहे.

दरम्यान, आज या संपूर्ण घटनेला 4 महीने पूर्ण झाले आहेत. त्यावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीसोबत बातचीत केली. यावेळी धनंजय देशमुख म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ते आमच्यासोबत अन्याय करणार नाही अशी आम्हाला आशा आहे. रोज घरी आल्यावर मला माझ्या भावाची चप्पल विहिरीजवळ सोडलेली दिसली की काळायचं तो घरी आलेला आहे. चप्पल नसेल तर मी त्याला लगेच फोन करून तो अजून का घरी आला नाही ते विचारायचो. आता बाहेरून घरी आल्यावर मला रोज ही गोष्ट आठवते. माझं, आमच्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आज सगळं विस्कळीत आहे. तो होता तेव्हा सगळं काही असल्यासारखं वाटायचं. आता फक्त न्यायाची लढाई उरलेली आहे. आम्ही तीच लढतो आहे, अशा भावना यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.

संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या वादातून झाली. धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती समजला जाणारा वाल्मिक कराड याला खंडणी घेण्यास संतोष देशमुख यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्याच रंगातून अतिशय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवला. धनंजय मुंडे यांचं नाव प्रकरणात आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. त्यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. गावकऱ्यांच्या संतापानंतर वाल्मिक कराडसह 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आला. मात्र अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. पोलिसांना अजूनही त्याचा ठावठिकाण समजलेला नाही. सीआयडीने सादर केलेल्या आरोपपत्रात देशमुख यांच्या हत्येच्या वेळी काढण्यात आलेले अमानुष छळाचे फोटो, व्हिडिओ मन हेलावणारे आहेत. आरोपपत्रात सर्व आरोपींनी हत्या केल्याची कबुली देखील दिली आहे. मात्र असं असूनही देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार? फरार आरोपी कृष्णा आंधळे कधी सापडणार हा प्रश्न कायमच आहे.

Published on: Apr 09, 2025 12:10 PM